टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवेळी त्यांना साथ दिलेल्या आमदारांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आमदार ठरले ते आमदार म्हणजे सांगोल्याचे शहाजीबापू पाटील… गुवाहाटीला गेल्यावर तिथले सौंदर्य पाहून शहाजीबापू तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलेले आपण सर्वांनी पाहिले.
काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… समद ओकेमंदी हाय… असे निसर्गाचे यथार्थ वर्णन करीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याशी साधलेला संवाद संपूर्ण देशभर गाजला. याच संवादामुळे शहाजीबापूंची संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख निर्माण झाली. यानंतर महाराष्ट्रात ते एवढे लोकप्रिय झाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील प्रत्येक सभेत शहाजीबापूंच्या ग्रामीण शैलीतील भाषणाची मागणी होऊ लागली. तेच शहाजीबापू पाटील आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहेत आणि कारण ठरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये होणारी विधानसभा निवडणूक.
शहाजीबापू पाटील हे पूर्वी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते. परंतु नंतर त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या विचारांनी ते भारावून गेले. 2019 ला त्यांनी सांगोला विधानसभा मतदार संघाची निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि जिंकली सुद्धा. आता 2024 ला मीच आमदार होणार आणि मंत्री देखील होणार, अशीही मनोमन इच्छा ते आपल्या निवडक कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखवू लागले. पण निवडणूक लागायच्या आधीच त्यांच्या उमेदवारी विरोधात महायुतीतलेच त्यांचे मित्र असलेल्या अजितदादांच्या शिलेदाराने सांगोला विधानसभा मतदारसंघावर दावा धावा ठोकल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आबांनी महत्त्वकांक्षा कायम ठेवल्यास बापूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशनमध्ये सांगोल्यातील मुंबईस्थित नागरिकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांचेवतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने सांगोला विधानसभा लढण्याचे संकेतच दिले आहेत. या मेळाव्याने शिवसेना शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे.
दीपकआबांनी सांगोला शहर व तालुक्यातील मुंबईस्थित नागरिकांसमोर मोठे शक्ती प्रदर्शन केले. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ‘फिक्स आमदार’ असे बॅनर आणि पोस्टर झळकावले. त्यामुळे सांगोल्यात महायुतीतील घटक असलेल्या शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारीवरुन संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
‘ज्याचा आमदार त्याची जागा’ असे जागावाटपाचे सूत्र महायुतीत ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर हेच सूत्र कायम राहिल्यास शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी सेफ झोनमध्ये असेल. यांच्या उमेदवारीला कोणताही धोका नाही. मात्र महाविकास आघाडी अर्थात शेकापच्या उमेदवाराविरोधात शहाजीबापू पाटील यांचा सामना रंगणार. हे निश्चित आहे.







