टीम लोकमन मरवडे |
गेली 25 वर्ष अविरतपणे कार्यरत राहून मायभूमीसह अवघ्या महाराष्ट्रातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या आणि मरवडेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या मरवडे फेस्टिवलचा यावर्षी रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतोय.
प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्या ओघवत्या वाणीने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या सुरेश पवार नावाच्या तरुणाने शशिकांत घाडगे, नवनाथ जाधव, रावसाहेब सूर्यवंशी, ॲड. राजाराम येडसे, किसन रोंगे, सिद्धेश्वर रोंगे यांचेसह मरवडे गावातील शेकडो सवंगड्यांना एकत्र करत मरवडे फेस्टिवलची सुरुवात केली. अवघ्या काही वर्षांमध्येच मरवडे फेस्टिवलने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं आणि बघता बघता हा मरवडे फेस्टिवल आज 25 व्या वर्षात पदार्पण करून आपला रौप्य महोत्सव महोत्सव साजरा करीत आहे.
त्यानिमित्तानेच मरवडे येथे एक भला मोठा बलून अवकाशात सोडण्यात आला आहे. आणि हा बोलून अवकाशात सोडण्याचा मान मिळाला आहे, ज्या मरवड्याच्या सुपुत्रांनी गावचा नावलौकिक सातासमुद्रापलीकडे पोहोचविला आहे, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावावी अशा सर्व मरवडे भूषण पुरस्काराच्या मानकऱ्यांना.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मरवडे भूषण रामचंद्र कोळी व प्रा. डॉ. धनाजी मासाळ यांचे अमृतहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मरवडे भूषण पुरस्काराचे मानकरी भारत घुले, गोविंद चौधरी, प्रा. डॉ. संतोष सुर्यवंशी, पैलवान दामोदर घुले, भिमराव घुले तसेच मरवडे भूषण पुरस्कार प्राप्त कुटुंबातील धोंडीराम गायकवाड, सुनील रमेश शिंदे इत्यादी मंडळींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व त्यांच्याच हस्ते अवकाशात बलून सोडण्यात आला.
यावेळी मरवडे नगरीचे माजी सरपंच अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, माजी सरपंच दादासाहेब पवार, माजी सरपंच अजितसिंह पवार, माजी सरपंच शिवाजी (बटू) पवार, माजी सरपंच जगन्नाथ मासाळ यांच्यासह यात्रा कमेटीचे डॉ. माणिक पवार, सुभाष भुसे सर, संभाजी रोंगे सर, राजाराम कालिबाग, तानाजी सुर्यवंशी तसेच युवा नेते धन्यकुमार पाटील, पोलिस पाटील महेश पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपती पवार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा मरवडे फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश पवार यांनी संपूर्ण फेस्टिवलच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.