टीम लोकमन मंगळवेढा |
देशात लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. यामध्ये देशात एनडीएने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचा धुव्वा उडवला.
महायुतीला आलेल्या अपयशानंतर महायुतीमध्ये कुरबूर सुरू झाली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आहेत. अशातच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटप कसे होणार याबाबत खुलासा केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचे विद्यमान आमदार उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतील. मुश्रीफ यांनी केलेल्या या विधानानंतर महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टी हा महायुतीतील मोठा पक्ष असल्याने सहाजिकच त्यांना जास्त जागा मिळतील. पण आम्ही आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांचे विद्यामान आमदार असलेल्या जागा निश्चितच मिळणार आहेतच. पण राहिलेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच जागावाटप होईल.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केली होती. यामध्ये त्यांना बहुमत असताना, अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे म्हटले होते.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 400 पारचा नारा दिल्यामुळे जागा कमी झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुतीतील पक्ष पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत असताना विधानसभेत हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीची आज पहिल्यांदाच बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली असताना महायुती विधानसभेची तयारी कशा पद्धतीने करणार हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरेल.









