टीम लोकमन नांदेड |
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लोहा कंधार विधानसभा निवडणूक लढवणारे प्रा.भाई मनोहर धोंडे यांच्या पत्नी वैशालीताई मनोहर धोंडे यांचे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले.
सेवा जनशक्ती पक्षप्रमुख तथा शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या पत्नी वैशालीताई मनोहर धोंडे वय 55 वर्ष यांचे दि. 5 नोहेंबर रोजी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 2 मुली असा परिवार आहे.
वैशालीताई धोंडे या लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे यांच्या काकु व सरपंच कैलास धोंडे यांच्या वहिनी होत्या. ताईंच्या पार्थिवावर त्यांचे मुळ गाव लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव येथे त्यांच्या शेतात वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार रोहीदास चव्हाण, शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार, अनेक गुरुवर्य यांच्यासह शेवडी बाजारपेठ लोहा, कंधार, सोनखेड, नांदेड, लातूर, अहमदपूर, परभणी, औरंगाबाद, सोलापुर सह कर्नाटक, तेलंगणा आंध्रप्रदेश येथील हजारोंच्या संख्येने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी व अथांग जनसमुदाय आवर्जुन उपस्थित होता.
लोहा बाजारपेठ बंद..
वैशालीताई मनोहर धोंडे मांच्या निधनाची वार्ता समजताच लोहा येथील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवून वैशालीताई मनोहर धोंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.