जत : पांडुरंग कोळळी
उमदी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी करजगी ता. जत येथे जुगार अड्डयावर छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्या ठिकाणचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात हिंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौलाली करीमसो मुजावर वय 43 रा. कागनरी, रवी शंकर कांबळे वय 39 रा. करजगी, संजय आप्पासाहेब कांबळे वय 30 रा. करजगी, सुभाष कुंडलिक शिवशरण वय 35 कगनारी, अप्पासाब अमीन जातगार रा. करजगी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तसेच कुलाळवाडी येथे विना परवाना दारु अड्डयावर छापा टाकून महादेव करू पडुलकर वय 65 रा. कुलाळवाडी या आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वीच उमदी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांनी उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांकडे आपला मोर्चा वळवल्याने उमदी परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कर्नाटक सीमेलगत हा परिसर येत असल्याने अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नव्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी अवैध धंद्यावर कारवाई सुरू केल्याने सर्वसामान्यांमधून त्यांचे कौतुक होत असून कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
जिल्हा मुख्यालयापासून शेकडो किलोमीटर दूर हा परिसर असून कर्नाटक सीमेलगत आहे. बहुतांश कन्नड भाषिक लोक या परिसरात राहतात. या परिसरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर नियंत्रण आणून गुन्हेगारी संपुष्टात आणणे, अवैध व्यवसायांना चाप लावण्याचे मोठे आव्हान नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासमोर आहे. त्यांनी त्यांची या पोलीस ठाण्यातील कारकिर्दीची सुरुवात तर सिंघम स्टाईलने केली असून ते अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरतात का? हे पाहणे औतुक्षाचे ठरेल.











