टीम लोकमन मंगळवेढा |
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब आणि ज.मो अभ्यंकर यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
निवडणुकीसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेच्या प्रसिद्धी पत्रकातून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षांपासून विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिल परब यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली आहे. 2012 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या ॲड. अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून भूमिका पार पाडली आहे.
दरम्यान शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण अनिल परब हे ठाकरेंसोबत राहिले. इतकेच नव्हे तर वकील असलेल्या अनिल परब यांनी शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईत सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान, शिक्षक मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेने ज. मो. अभ्यंकर यांना संधी दिली आहे. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षकांच्या नाय व हक्कांसाठी सतत लढत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहे.
यावेळी 26 जून रोजी दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे.










