टीम लोकमन मंगळवेढा |
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची यंदा ही १०४ वी जयंती साजरी होत असून, त्या निमित्तानं सामाजिक, साहित्यिक वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अण्णाभाऊंच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या मराठी साहित्यातील योगदानाबद्दल माहिती दिली. शाळेतील सहशिक्षिका सौ.स्नेहल होनमाने यांनी अण्णाभाऊंच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कामगिरीचे महत्व विषद केले.
यावेळी उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा उल्लेख केला. अण्णा भाऊ साठे हे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते, परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणानं इतिहास घडवला. कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या.
ते अष्टपैलू साहित्यिक, कलावंत होते. ‘इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन’ या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते. त्यांनी दलित साहित्याचा पाया रचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लेखन केलं. कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा, लावण्या, चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.
या कार्यक्रमासाठी उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.अपर्णा शिंदे यांनी केले.









