टीम लोकमन मंगळवेढा |
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
27 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचप्रमाणे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. अशोक महाराज मोरे (श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचणूरचे सेवानिवृत्त मराठी शिक्षक) यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर पांडुरंग देशमाने, महेश पाटील (राज्य कार्यकारिणी व्हाईस ऑफ इंडिया) देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वाद विवाद, संवाद, भाषण सादर केले. त्यानंतर अतिथी म्हणून उपस्थित असलेले अशोक महाराज मोरे यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व विविध उदाहरणांच्या साह्याने अगदी समर्पक आणि सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यानंतर महेश पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी देखील दैनंदिन जीवनातील मराठी भाषेचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, हिरकणी महिला पतसंस्थेच्या चेअरमन व प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी देखील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.









