टीम लोकमन सोलापूर |
राज्याचे नवनिर्वाचित परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे एसटी बसने सोलापूर ते धाराशिव असा प्रवास केला. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या दिमतीला एसटी महामंडळाने नवीन कोरी एसटी बस उपलब्ध केली होती.
दुसरीकडे मंत्री येणार असल्यामुळे सोलापूर बसस्थानक दिवसभर स्वच्छ ठेवण्यात आले होते. मंत्र्यांचा हा दौरा पूर्वनियोजित न होता अचानकपणे झाला असता तर एसटी बस व प्रवासासंदर्भात प्रवाशांच्या अडचणी, एसटी बसेसची झालेली दुरावस्था समोर आली असती अशी प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ते सोलापूरहून धाराशिवला जाण्यासाठी त्यांनी एसटी बसने प्रवास केला. त्यासाठी एसटी महामंडळाने खास नवीन सजविलेली एसटी बस दिमतीला ठेवली होती. या नव्या एसटी बसशेजारीच मोडक्या, रंग उडालेल्या इतर एसटी बस सामान्य प्रवाशांसाठी थांबल्या होत्या. हा फरक यावेळी प्रकर्षाने जाणवत होता. त्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता एसटी महामंडळातील नकारात्मक बाजूंची कबुली दिली. मात्र येत्या महिन्याभरात सुधारणा होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, आपण परिवहनमंत्री झाल्यापासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एसटी बसने प्रवास करतो. या माध्यमातून एसटी महामंडळाची चांगली-वाईट परिस्थिती, सामान्य प्रवाशांच्या समस्या कळतात. एसटी प्रवाशांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची नीटपणे अंमलबजावणी होते की नाही. यांचीही पडताळणी करता येते. विशेषतः बस आगारासह तेथील प्रसाधन गृहांची स्वच्छता राखली जाते की नाही हे देखील नजरेत येते. आपला सोलापूर ते धाराशिव एसटी बस प्रवास दौरा पूर्वनियोजित असल्यामुळे सर्वत्र सुधारणा दिसल्या तरी प्रत्यक्षात प्रवाशांशी बोलताना त्यांच्याकडून एसटी महामंडळाकडून होणाऱ्या वाईट गोष्टींची माहिती कानावर पडल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने वाईट गोष्टी कितीही लपवून ठेवल्या तरीही त्या प्रत्यक्षात लपून राहतात असे नाही. त्या अनुषंगाने लवकरच सुधारणा झालेल्या दिसतील. असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.







