टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यात वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या २०० च्या वर पोहोचली आहे. नाशिक, बुलढाणा, जालना व धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक नोंदले आहे. यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याचे प्रमाण अधिकच वाढत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांमध्ये राज्यभरात उष्माघाताचे तब्बल २०५ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण नाशिक २३, बुलढाणा २१, जालना २० आणि धुळ्यामध्ये २० आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये २६ एप्रिलपूर्वी उष्माघाताच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात २६ एप्रिलपासून ५ मेपर्यंत २१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जालनामध्ये सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या २० झाली आहे, त्याखालोखाल नाशिक आणि बुलढाण्यामध्ये प्रत्येकी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक आणि बुलढाण्यातील रुग्णांची संख्या अनुक्रमे २३ आणि २० वर पोहोचली आहे. मात्र धुळ्यातील रुग्णांची संख्या स्थिर असल्याचे पहायला मिळते. दरम्यान, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्चमध्ये अवघे ४० रुग्ण सापडले होते, तर एप्रिलमध्ये तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत.
वाढते तापमान, हवेतील आर्द्रता यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. चक्कर येणे, उलटी व मळमळ, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे, ही उष्माघाताची लक्षणे आहेत. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी. तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ सुती कपडे वापरावेत. घराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करा. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्या. उन्हामध्ये काम करताना डोक्यावर टोपी, पांढरा रुमाल, छत्री घ्यावी. ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे, लस्सी,ताक, लिंबू पाणी प्यावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम आदींमुळे उन्हाचा झटका बसू शकतो. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. मनीष बसंतवाणी
कन्सल्टिंग फिजिशियन
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल