टीम लोकमन मंगळवेढा |
श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष या विभागामार्फत दिनांक 14 जून 2024 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सूचनेप्रमाणे महाविद्यालय स्तरावरती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झालेली असून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची माहिती प्राध्यापक व विद्यार्थ्यांना देण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंदजी शहा यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रो. डॉ. शशिकांत गायकवाड, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरचे प्रो. डॉ. दीपक ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. दीपक ननवरे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज व भीती पसरलेली आहे. या धोरणानुसार प्राध्यापकांचा पहिला प्रश्न असतो की, प्राध्यापकांच्या कार्यभाराचे काय? मुलांना प्रवेश कसा द्यायचा? आता ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. आपण मुलासाठी आहोत हे लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाचा हेतू हाच आहे की, विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय ज्ञान मिळावे, विविध कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांची प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढावी. त्यामुळे गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. शशिकांत गायकवाड म्हणाले की, भारतामध्ये 2020 नंतर तयार होणारा नागरिक कसा असावा याचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ठरवण्यात आले आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असून ही भूमिका पालकाची असावी. पालक हा आपल्या पाल्याला सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण विद्यार्थ्यांना सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानाने समाजामध्ये जगता आले पाहिजे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यशस्वी करण्याची जबाबदारी जशी शासनाची विद्यापीठाची आहे तशीच आपल्या सर्वांची आहे. हे आपण ध्यानात घेऊन कार्य केले पाहिजे.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे असून त्याबद्दलची कार्यशाळा घेऊन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना माहिती देणे महत्त्वाचे होते. हे लक्षात घेऊन आम्ही प्रमुख पाहुण्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला मार्गदर्शन केले. आजच्या कार्यशाळेमुळे आम्हाला बहुमोल अशी माहिती मिळाली आहे. त्याचा निश्चितच आमच्या महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये फायदा होईल.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. डॉ. पी. एम. होनराव यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.संजय शिवशरण यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्राध्यापिका सरिता माने व प्रा. डॉ. सुधाकर राठोड यांनी केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नवनाथ जगताप व प्रा. डॉ. राजेश गावकरे यांनी आभार मानले.











