टीम लोकमन मंगळवेढा |
गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात (जीबीएस) (Guillain-Barré Syndrome) आजाराचा धोका वाढला आहे. या आजाराचे रुग्ण आता मुंबईसह पुणे, सोलापूर, कोल्हापूर व नागपुरातही आढळून आले आहेत.
कोल्हापुरात जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात एक 12 वर्षाची मुलगी आहे. ती मुळची झारखंड येथील असून तिचे कुटुंबीय कामानिमित्त हुपरी येथे वास्तव्यास आहेत. तर कोगनोळी येथील 60 वर्षाचा व्यक्ती जीबीएस बाधित आढळून आला आहे. या दोघांवरही सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. जीबीएस हा कोरोनासारखा आजार नाही. यातून लोक बरे होतात. त्याची भीती बाळगू नये असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
उपचाराला उशीर झाल्याने सोलापुरातील रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा आजार संसर्गजन्य आजार नाही. स्वच्छ पाण्याचा वापर, पाणी उकळून पिणे या उपाययोजनांमुळे जीबीएस आजारापासून दूर राहू शकतो. यापूर्वीपासूनचे या आजाराचे अस्तित्व आहे. हा आजार आता आलेला नाही असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. खासगी रुग्णालयांनी जीबीएस रुग्णांकडून अधिकचे पैसे घेऊ नयेत असेही त्यांनी नमूद केले.
कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये 2 रुग्णांवर उपचार सुरु
2024 मध्ये वर्षभरात 24 रुग्ण दाखल होते. त्यातील एकही रुग्ण दगावलेला नाही. यावर्षी जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत दोन रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झाले. बालरोग विभागात एक बारा वर्षाची मुलगी दाखल आहे. ती झारखंडची असून तिचे घरचे कामानिमित्त हुपरी इथे वास्तव्यास आहेत. दुसरा रुग्ण बेळगाव येथील असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. या आजारात मृत्यूचे प्रमाण जास्त नाही. शंभरमधल्या एकाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते असे प्रमाण आहे. रुग्ण वाढले तर सीपीआर रुग्णालयात 70 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली आहे.
नागपूरमध्येही 4 रुग्णांना लागण
तर नागपूरमध्ये जीबीएसची 4 रुग्णांना लागण झाली असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. रविवारी (दिनांक 26) या आजाराने राज्यात पहिला बळी सोलापुरात घेतला. सोलापूरमध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण कल्लप्पा विभुते (वय 40, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल
राज्यात जीबीएस आजाराने टेन्शन वाढवले आहे. पुण्यात तर जीबीएसने थैमान घातले आहे. संशयास्पद आणि खात्री पटलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्यातील आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय पथक पाठवले आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ व्हायरचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी विभागीय आयुक्त पुणे कार्यालयात आढावा बैठक घेतली. ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी आणि शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. तसेच आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून एकदम थोड्या रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाऊ नये. याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी. या आजाराचे सोमवार पर्यंत 111 आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तर काही रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि इतर जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
Guillain-Barre Syndrome गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) ही एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती पेरीफेरल नसावर हल्ला करते. याची सर्व वयोगटातील लोकांना लागण होऊ शकते. पण प्रौढ व्यक्तींना याची लागण होणे हे अधिक सामान्य आहे. बहुतांश लोक या सिंड्रोमच्या सर्वात गंभीर परिस्थितीतून पूर्णपणे बरे होतात. या सिंड्रोममुळे गंभीर आजारी होण्याचे प्रमाण फार दुर्मिळ आहे. पण यामुळे संपूर्ण अर्धांगवायू आणि श्वसनाशी समस्या उद्भवू शकतात. काही परिस्थितीत गुलेन बॅरी सिंड्रोम जीवघेणाही ठरू शकतो. या आजाराने बाधित रुग्णांनी शक्य तितक्या लवकर उपचार घ्यायला हवेत. काही रुग्णांना अतिदक्षता उपचाराची सुद्धा गरज भासू शकते. हा सिंड्रोम स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम करु शकतो. यामुळे स्नायूची ताकद कमी होऊन अशक्तपणा जाणवू शकतो. पाय आणि हातांमध्ये संवेदना कमी होऊ शकते. तसेच गिळताना अथवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
काय आहेत लक्षणे?
• याची लक्षणे काही आठवडे राहू शकतात.
• बहुतांश लोक दीर्घकालीन आणि गंभीर न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीशिवाय बरेही होतात.
• यामुळे अशक्तपणा येतो. पायांपासून ते हात आणि चेहऱ्यावर त्याचा परिणाम जाणवतो.
• काही लोकांना अर्धांगवायू होऊ शकतो.
• या सिंड्रोममुळे एक तृतीयांश लोकांमध्ये छातीच्या स्नायूंवर परिणाम होतो. यामुळे श्वास घेणे कठीण होते.