टीम लोकमन सोलापूर |
तांबेवाडी ता. बार्शी या गावामधील आश्रमशाळा तांडा वाडीवस्तीमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना मार्गी लागल्यामुळे आज ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहेत.
सोलापूर व धाराशिव या दोन्ही जिल्हयाच्या सरहददीवर सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडा हे गाव आहे. हे गाव तालुक्यापासून साधारणतः 27 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या 1845 असून 320 इतकी कुटूंब संख्या आहे. या गावात लहान लहान चार वाडीवस्त्या आहेत. सन 2021 मध्ये या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये 7 सदस्य निवडून आलेले असून या सदस्यांच्या सहकार्याने गावचे युवा सरपंच रवी राठोड व ग्रामसेवक गोपाळ सुरवसे हे ग्रामपंचायतीमधील विविध विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
तांबेवाडी या गावामधील आश्रमशाळा तांडा वाडीवस्तीमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेमधून पाणी पुरवठा योजना करण्यात आली होती पण ही योजना बरेच दिवस नादुरूस्त असल्यामुळे योजना पूर्णपणे बंद अवस्थेत होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील ग्रामस्थ विशेषतः महिलांना घर व शेतांमधील काम सोडून या गावच्या परिसरात असणा-या हातपंप व शेतातील विहीरीमधून पाणी आणण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती.पण फेब्रुवारी 2021 मध्ये गावामधील 25 वर्षाचे युवक रवी राठोड हे सरपंच झाले आणि त्यांनी गावच्या विकासाची सुत्रे हाती घेतली तसेच गावामध्ये विविध विकास कामे करण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा त्यांनी आश्रमशाळा तांडा वाडी वस्तीमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले.
आश्रमशाळा तांडा तांबेवाडी या गावामधील प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी शुध्द व पुरेसा पाणी पुरवठा योजना राबविणे आवश्यक होते. म्हणून ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती बार्शी येथे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावरून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.या प्रस्तावानुसार सन 2022-23 मध्ये विहिर, पंपींग मशिनरी, उर्ध्व वाहिनी, वितरण व्यवस्था, ट्रायल रन, विद्युत जोडणी, पाणी साठवण टाकी अशी कामे घेण्यात आली. या कामासाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर वर्षभरामध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी सर्व कामे पूर्ण करण्यात आली. सदर कामासाठी 79 लाख 23 हजार 25 रूपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
आज आश्रमशाळा तांडा तांबेवाडी या गावात सर्व 320 कुटूंबांना नळ जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे विहिरीमधील विद्युत पंपाद्वारे पाण्याच्या टाकीमध्ये साठविले जाते आणि प्रत्येक कुटूंबांना प्रती माणसी ५५ लिटर याप्रमाणे शुध्द पाणी पुरवठा केला जातो. ज्या गावामधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी काही दिवस त्रास सहन करावा लागला. आज त्या गावामधील ग्रामस्थांना जल जीवन मिशन या योजनेमुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
गावात पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागााचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी, पंचायत समिती बार्शी, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बार्शी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच बार्शी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, माजी उपसभापती प्रमोद वाघमोडे, सरपंच रवी राठोड, उपसरपंच समाधान पवार, सदस्य कातांबाई जाधव, उत्तम जाधव, अश्विनी पवार, अनिल राठोड, धनाजी काकडे, सविता चव्हाण, राम चव्हाण यांच्यासह गावामधील सर्व पदाधिकारी यांचे विशेष योगदान लाभले आहे.