टीम लोकमन मंगळवेढा |
आजच्या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण माचणूर येथील युवा उद्योजक सुरज डोके व धनश्री डोके या दांपत्याने आपल्या राजवर्धन या लाडक्या सुपुत्राच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत मंगळवेढा येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संचलित करुणा मतिमंद व मूकबधिर शाळा मंगळवेढा येथे जवळपास 25000 रुपये किंमतीचे व एकाच वेळी जवळपास 25 मुलांचे गरम पाणी होणारे 150 लिटर एल.पी.डी. सोलर वॉटर हीटर या मूकबधिर शाळेला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. युवा उद्योजक सुरज डोके यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डोके दांपत्याने आपला मुलगा राजवर्धन याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील करुणा मतिमंद व मूकबधिर शाळा येथे सोलर वॉटर हीटर व सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रातीनिमित्त पुरणपोळी जेवणाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक सुरज डोके होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट, मुख्याध्यापक हेंबाडे सर, पाटकर सर, राकेश पाटील, प्रभाकर कादे, सुरज आवळे, शामल स्वामी, शेवंता ऐवळे, धनश्री डोके, विद्या डोके, अविनाश डोके, माधुरी डोके, वैष्णवी पुजारी व दिनकर पाटील, सागर सप्ताळ इत्यादी उपस्थित होते.
सध्याच्या काळात हॉल, मंडप, डेकोरेशन, पार्टी यावर अवाढव्य खर्च करत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहे. आपला वाढदिवस भव्यदिव्य कसा साजरा केला जाईल याकडे सध्या ग्रामीण भागातील तरुणात क्रेझ निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या दिवशी डीजे लावून नाचणाऱ्यांची संख्याही आजकाल कमी नाही. परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत माचणूर येथील डोके परिवाराने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेत अत्यंत आवश्यक असणारा सोलर वॉटर हिटर देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
आपण या समाजाचे काहीतरी तरी देणं लागतो या उदात्त भावनेने आमच्या डोके परिवाराने या मूकबधिर प्रशालेस आवश्यक असणारा सोलर वॉटर हिटर बसवून दिला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा हजारो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळून आम्ही हा उपक्रम मनापासून राबवला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवून अशा चांगल्या गोष्टींना सहकार्य करणे आवश्यक आहे.
सुरज डोके युवा उद्योजक, माचणूर