टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरात गेली चार महिने मनोरुग्ण झालेली 65 वर्षे वयाची महिला बेघर असल्याने रस्त्यावर अन्न पाण्यावाचून असहाय्य अवस्थेत जगणाऱ्या आजीला वारी परिवाराने माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये दाखल करून हक्काचा निवारा दिला आहे.
मनोरुग्ण असल्याने कधी विवस्त्र, कधी अस्ताव्यस्थ पडलेली चौकात दिसायची. ही वयोवृद्ध महिला मंगळवेढ्यातील रस्त्यावर पडून असल्याने आणि त्यात एक महिला असल्याने ते पाहनेही मानवतेची विटंबना वाटावी अशी पाहणाऱ्यांनाही सहन न होणारी गोष्ट होती. अशा परिस्थितीत तिची व्यवस्था कोण करणार हा प्रश्न होता. हळहळण्याशिवाय काहीच करू न शकणे अशी तिची अवस्था. पोटात अन्न नाही, शारीरिक विधीचे भान नाही, सर्व देह घाणीने माखलेला, कुणी जवळ जायलाच काय पहायलाही धजावत नव्हतं, तिथे तिला सहारा देणे आणि मदत करणे ही दूरचीच बाब होती.
जीवघेण्या थंडीत उघड्यावर दिवसरात्र मारणयातना सोसत पडून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. या गोष्टीकडे मंगळवेढ्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वारी परिवारातील तरुणांच्या संवेदनशील अंतःकरणाने विचार केला. या प्रश्नावर मार्ग काढत असताना अहिल्यानगर जिल्यातील देहरे येथील घर आणि मन हरवलेल्या माणसांचे मनगाव आठवले. तिथे दाखल करण्याविषयी माहिती घेतल्यानंतर त्या बेघर आजीस तिथे आश्रय मिळून चांगला निवारा व औषधोपचारासह अतिशय सुसज्ज व्यवस्था होऊ शकते हे समजल्यावर तिथे नेण्यासंदर्भात सर्व तयारी केली.
नगरपालिका प्रशासन आणि पोलीस स्टेशनची रीतसर परवानगी घेऊन शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी ॲम्बुलन्सची व्यवस्था करून डॉ. सुचिता धामणे आणि डॉ. राजेंद्र धामणे चालवत असलेल्या मनगाव येथे पोहचवण्यात आले. निराधार मनोरुग्ण महिलांसाठी ही संस्था कार्यरत आहे. इथे अशा मनोरुग्ण महिलांना सर्व सुविधासह सोय केली जाते.
मंगळवेढ्यात निराधार पशुवत पडलेल्या या महिलेस तिथे दाखल केल्यावर व्हिलचेअरवर बसवून पुढील उपचारासाठी नेत असताना पहिले तेव्हा नेणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाचा चैतन्यदाई उजेड उजळून आला. एका निराधार जीवाला रस्त्यावरून राजप्रसादाच्या सिंहासनावर बसल्यासारखी ती आश्रयाला पोहचवल्याचे समाधान झळकू लागले.
यावेळी रविंद्र सातपुते, रमेश टाकणे, रणजित चेळेकर, महाराष्ट्रातील नामवंत कवी इंद्रजीत घुले, सोमनाथ भगरे, ॲम्बुलन्स चालक भास्कर गुरव, प्रा. विनायक कलुबर्मे उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशन, मंगळवेढा नगरपरिषद, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विवेक निकम यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवेढ्यातील रस्त्यावर कडक्याच्या थंडीत कुडकूडत झोपणाऱ्या मनोरुग्ण बेघर आणि निराधार झालेल्या आजीला उर्वरित आयुष्य तरी आनंदाने जगता यावे आणि खरा देव दगडात नसून माणसात आहे या विचारातून वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. धामणे यांच्या अहिल्यानगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान मनगाव येथे दाखल करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हक्काचा निवारा देऊन आधार दिला आहे.
प्रा. विनायक कलुबर्मे, वारी परिवार मंगळवेढा








