टीम लोकमन सांगोला |
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या परिसरातील शेतकरी, पशुपालक, छोटे-मोठे व्यवसायिक आणि उद्योजक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असलेली आणि विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हक्काची संस्था म्हणून ओळख असलेली सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या वतीने सांगोला शहर आणि तालुक्यातील महिलांसाठी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चना अनिल इंगवले यांनी दिली.
महाराष्ट्रात दरवर्षी भाद्रपद महिन्यात अत्यंत लोकप्रिय असा गणेशोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान अनेक घरांमध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करण्यात येते. घरामध्ये गौरीचे पूजन करून या घरगुती गौरी आणि गणपती समोर अनेक पदार्थ, फळे तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची सुंदर अशी आरास देखील करण्यात येते. अशा प्रकारच्या गौरी पूजनामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान व ऐश्वर्य यांची वृद्धी होते असे मानले जाते.
अलीकडील काळामध्ये विविध प्रकारचे साहित्य व हस्तकला यांचा सुयोग्य वापर करत विविध सामाजिक विषय व घडामोडी यावरती आकर्षक देखाव्यांमधून प्रकाश टाकण्यात येतो. या पारंपारिक अशा धार्मिक उत्सवाला उत्तेजन देण्यासाठी सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या कल्पकतेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धाकासाठी आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात येणार असून पहिल्या पाच विजेत्यांसाठी अनुक्रमे फ्रिज, आटाचक्की, ओव्हन, मिक्सर आणि कुकर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही सजावट व आरास या करिता इको फ्रेंडली साहित्य व हस्त कौशल्य यासाठी प्राधान्य दिले जाणार असून आकर्षक मांडणीसह प्रत्येक साहित्य स्वनिर्मित असावे.
तसेच या संदर्भातील फोटो आणि माहितीचे संकलन देखील आकर्षक असावे. चालू वर्षातील ठळक घडामोडींवर यामधून प्रकाश टाकण्यात यावा. सहभागी स्पर्धकांनी या संपूर्ण सजावटीचा 3 मिनिटांचा व्हिडिओ करून दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 7711882002 / 9130795387 या क्रमांकावर पाठवावा अथवा सांगोला शहरांमध्ये महात्मा फुले चौकातील संस्थेच्या कार्यालयात समक्ष आणून द्यावा.
सोबत संपर्क क्रमांक व संपूर्ण पत्ता देखील देणे बंधनकारक राहील. अशी माहितीही चेअरमन सौ. अर्चना इंगवले यांनी दिली. या स्पर्धेसाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ. ज्योती भगत यांनी केले आहे.