टीम लोकमन मंगळवेढा |
भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने सर्वत्र संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये भारतीय संविधाना बाबत सर्वसाधारण माहिती देणे, संविधानाची तत्त्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे, विविध स्पर्धा राबवणे यासारखे उपक्रमांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांची रॅली मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती.
मंगळवेढा शहरातील विविध भागातून घेण्यात आली. या रॅलीमध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर नगरपालिका शाळा नंबर 3 मधील विद्यार्थीही सहभागी झाले होते. संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये सादर करत जन माणसांचे लक्ष वेधून घेतले.

या रॅली दरम्यान नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, नगरपालिका शाळा नंबर 3 चे मुख्याध्यापक सिद्धेश्वर जाधव, येताळा खरबडे यांचेसह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेत परत आल्यानंतर सर्व मान्यवरांचा प्रशालेकडून यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका वाचनाने या रॅलीची सांगता झाली.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ व एमएमएस हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. पुष्पांजली शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली यशस्वीरित्या संपन्न झाली.








