न्यूज लोकमन सांगोला |
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते, संघर्षयोद्धा, मराठा तरुणांचे हृदयसम्राट, मराठा समाजाचे झुंजार नेते मनोज जरांगे पाटील उद्या सोमवारी सांगोल्यात येणार असल्याने सांगोल्यातील मराठा तरुणांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पहायला मिळत आहे.
सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते सध्या नव्याने सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामाची पाहणी करणार आहेत.
यानंतर जरांगे पाटील मिरज रोडवरील सदानंद हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केलेल्या मराठा समाज बांधवांच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सांगोला दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगोला तालुका लोकसभेला माढा मतदारसंघात येतो या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. या मतदारसंघात आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे तर राजकारणातील चाणक्य आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही धैर्यशील मोहिते पाटलांसाठी डाव टाकले आहेत.
मनोज जरांगे पाटील सांगोल्यात येऊन मराठा समाजाला कोणता कानमंत्र देतात आणि ते निवडणुकीसंदर्भात समाजाला काय सूचना देतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या सांगोला दौऱ्याची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.









