टीम लोकमन मंगळवेढा |
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत, त्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशाराच त्यांनी दिला होता.
त्यानंतर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे. ’19 तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल, माझी सीट मी महायुतीला देणार’ असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले आहेत बच्चू कडू?
’19 तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल, माझी सीट मी महायुतीला देणार. जर मागण्या मान्य झाल्या तर मग निवडणूक कशासाठी लढवायची’ असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की ‘मी महायुतीमध्ये नाहीये, तुम्हाला कोण म्हटले मी महायुतीमध्ये आहे. आम्ही 19 तारखेला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत, मागण्या मान्य झाल्या तर मी निवडणूक लढवणार नाही. आमची तिसरी आघाडी नसेल तर आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी करू, ती पहिली आघाडी असेल बाकी सगळ्या आघाड्या त्यानंतर येतील असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
काय आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या?
आम्ही सरकारला एकूण 18 मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ज्यामध्ये पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमीमधून करावीत, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावेत, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी अशा आमच्या मागण्या असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.











