टीम लोकमन मंगळवेढा |
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबचे सदस्य सिद्धेश्वर डोंगरे, मेजर तानाजी हेंबाडे व प्रा. विनायक कलुबर्मे सायकलवर मंगळवेढा ते मुंबई 400 किलोमीटरचा सायकल प्रवास करीत आंदोलन स्थळी जाणार आहेत. पंढरपूर, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, लोणंद, जेजुरी, सासवड, पुणे लोणावळा, पनवेल, वाशी या मार्गांवरून दररोज 125 किलोमीटर सायकलिंग करणार असुन 4 दिवसात मुंबई येथील आझाद मैदानात पोहचणार आहेत.
दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता शिवालयातील शिवमुर्तीचे पूजन करून तिन्ही सायकलस्वार मार्गस्थ झाले असुन पहिला मुक्काम फलटण, दुसरा मुक्काम पुणे, तिसरा मुक्काम पनवेल तर चौथा मुक्काम मुंबई येथे करणार आहेत. आरक्षणासाठी व सगेसोयरे अद्यादेश अंमलबजावणीसाठी मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मराठा समाजासाठी लढत आहेत.
मराठा आरक्षणाच्या लढ्याचे साक्षीदार होण्यासाठी सायकल वरती मराठा बांधव मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. समाजासाठी आपलाही थोडा त्याग असावा याकरिता या आगोदरही अंतरवाली सराटी येथे झालेल्या विराट महासभेला तसेच सोलापूर येथील शांतता रॅलीसाठी सायकल वरती गेले होते आणि मराठा समाजाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली होती.
मंगळवेढा शहर व तालुक्यातुन बहुसंख्येने सकल मराठा समाजातील बांधव फोरव्हीलर तसेच टू व्हिलरने मुंबईकडे जाणार असले तरी डोंगरे, कलुबर्मे, हेंबाडे हे मात्र सायकलवरती मुंबईला गेले असुन हा हटके सायकल प्रवास लोंकाना चांगलाच भावला असुन सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने कौतुक होत आहे. यावेळी सायकल वारीस शुभेच्छा देण्यासाठी मंगळवेढा सकल मराठा समाजाचे बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते.