टीम लोकमन बीड |
एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भुल देण्याचे (शस्त्रक्रियेवेळी बधीरीकरण करण्यासाठीचे) इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी (दिनांक 26) रोजी समोर आली आहे. डॉ. संजय सोनाजी ढवळे (वय 29, राहणार. जुजगव्हाण ता. बीड) असे या तरुण डॉक्टराचे नाव आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच काय तो प्रकार समोर येईल असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगीतले. तालुक्यातील जुजगव्हाण येथील मजुरी करणाऱ्या कुटूंबातील डॉ. संजय ढवळे शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते.
तसेच डॉ. संजय ढवळे शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर म्हणूनही कार्यरत होते. शनिवारी त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्र व नातेवाईकांनी ते भाड्याने राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता डॉ. संजय पवार यांचा मृतदेह त्यांच्या बेडवर आढळून आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन जुजगव्हाण येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ व एक अविवाहित बहिण असा परिवार आहे.
डॉ. संजय यांनी भुल देण्याचे इंजेक्शन टोचले
डॉ. संजय ढवळे यांच्या मृतदेहाशेजारी भुल देण्याचे इंजेक्शन (शस्त्रक्रीयेवेळी बधीरीकरण करण्याचे) निओव्हेक 10 नावाचे इंजेक्शन आढळले आहे. या इंजेक्शनमध्ये व्हेक्युरोनिअम ब्रोमाईड घटक असून याचा उपयोग केवळ शस्त्रक्रीयागृहात किंवा अतिदक्षता विभागातच केला जातो असे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पारखे यांनी सांगीतले. शस्त्रक्रियेदरम्यान पेशी हालू न देण्यासाठी, गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना त्यांच्या हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते. त्याचा श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होतो. म्हणूनच त्यासोबत व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणा आवश्यक असते. रुग्णालयाबाहेर किंवा वैद्यकीय देखरेखीशिवाय वापरल्यास यामुळे काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले.
डॉक्टर संजय यांच्या नातेवाईकांचा मन हेलावणारा आक्रोश
जिल्हा रुग्णालयात डॉ. संजय ढवळे यांचा मृतदेह आणल्यानंतर त्यांची आई, बहिण, वडिल व भाऊ यांचा मन हेलावणारा आक्रोश होता. यामुळे तेथील उपस्थितांचेही डोळे पाणावले.