टीम लोकमन मंगळवेढा |
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मधील एका शिक्षिकेने चक्क जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिली. त्याची गंभीर दखल सांगली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली असून प्रशासनाने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. विश्रामबाग पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी सांगली जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात हा गोंधळ झाला. त्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षिका कवठेमहांकाळमध्ये सहकुटुंब राहण्यास आहे. जत तालुक्यातील एका शाळेत नियुक्त आहे. तिच्या वर्तनाविषयी पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. याची दखल घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पालकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने सुमारे दीड महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तिच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तसेच निलंबन कालावधीमध्ये शिराळा तालुक्यात नियुक्ती दिली होती.
पण दूरच्या तालुक्यात नियुक्ती दिल्याने शिक्षिका संतापली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातच बदलीची मागणी केली. त्यासाठी महिन्याभरापासून जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांकडे त्या शिक्षिकेने पिच्छा पुरविला होता. मात्र कारवाईवर प्रशासन ठाम राहिले. त्यामुळे तिने सोमवारी रुद्रावतार धारण करीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनात दंगा केला. ‘कवठेमहांकाळमध्ये बदली केली नाही तर जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करु,’ असा इशारा दिला. धोडमिसे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
शिक्षिकेची बदली शिराळा तालुक्यात केली असली, तरी प्रशासकीयदृष्ट्या तशी कार्यवाही केली होती. तीन महिन्यांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा पूर्ववत नियुक्ती दिली जाणार होती. पण शिक्षिकेने प्रशासनाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषदेत बेशिस्त वर्तन केले.
तृप्ती धोडमिसे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली










