टीम लोकमन |
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात कारमध्ये जळून महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात भयंकर हत्याकांड उघड झाले आहे. जी घटना एखादा अपघात असल्याचे सांगितले जात होते. तो एक सुनियोजित हत्येचा कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपी डॉक्टर पतीने आधीच घरी पत्नीचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने 50 किलोमीटर दूर जात कारवर पेट्रोल टाकून पत्नीसह कारला आग लावली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचे नाव सीमा कुर्मी असे असून आरोपी पती डॉक्टर निलेश कुर्मी आहे. पोलिसांनी आरोपी पती डॉक्टर निलेशला 2 साथीदार रामकृष्ण आणि शुभम यांच्यासह अटक केली आहे. तपासात मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 20 मार्चच्या रात्री 2 वाजता निलेश घरी परतला होता. रात्री उशिरा घरी आल्याने पत्नी सीमाने त्याला प्रश्न विचारले. ज्यातून या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात निलेशने सीमाचा गळा दाबला. त्यानंतर सीमा बेशुद्ध झाली त्यामुळे आरोपी घाबरला आणि हे कृत्य लपवण्यासाठी त्याने षडयंत्र रचले. त्याने रामकृष्ण आणि शुभम या दोघांना बोलावून घेतले आणि सीमाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत तिला घेऊन हॉस्पिटलला जायचे असल्याची बतावणी केली. त्यानंतर या तिघांनी मिळून सीमाला कारमध्ये बसवले.
हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली. तिने आरोपीला विचारले असता त्याने आईला डॉक्टरकडे घेऊन जातोय दरवाजा लाव असे सांगितले. त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याने सासरे आणि मेहुण्याला फोन करून सीमाची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. परंतु षडयंत्र भलतेच काहीतरी होते. पहाटे 4 च्या सुमारास गढाकोटा रोडवरील चनाटोरियाजवळ निर्जनस्थळी कार पोहचली. त्याने कार बाजूला घेत पत्नीच्या शरीरावर आणि कारवर पेट्रोल टाकून दोघांना आग लावली. आग लागल्यानंतर तो साथीदारांसह तिथेच कार जळताना पाहत होता. कुणीही सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेबाबत आरोपीने पोलीस आणि नातेवाईकांना वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. कधी हार्ट अटॅक, कधी अपघात तर कधी CNG ब्लास्ट. पोलिसांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात संशय येत होता. घटनास्थळी जळालेली माचिस, कारची स्थिती आणि तांत्रिक तपासणीनंतर अनेक तथ्ये समोर आल्याने त्यातून या घटनेचा पर्दाफाश झाला.
तपासात काय काय उघड झाले?
पोलिसांनी घटनेचा तपास केला असता त्यात निलेशचे एका युवतीसोबत अफेअर सुरू असल्याचे समोर आले. ज्यातून पती पत्नी यांच्यात बराच काळापासून वाद सुरु होता. पत्नीने विरोध केल्यानंतर निलेशने तिचा काटा काढण्याचे ठरवले. पोलिसांनी आरोपीच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्यात काही सापडले नाही. सीमाचा मृत्यू गळा दाबून झाला की जळाल्याने झाला याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच माहिती मिळेल. यासाठी रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेशसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या तिघांविरोधात पोलिसांकडून हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






