टीम लोकमन मंगळवेढा |
परिवहन मंडळाच्या मेकॅनिकने महिलादिनी जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या चालकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज (बुधवार) रोजी बेळगाव येथे बस आगारात घडली आहे.
बालचंद्र शिवाप्पा हुक्कोजी (वय 47, रा. मारुती गल्ली, जुनी गांधी नगर) असे जीवन संपवलेल्या बस चालकाचे नाव आहे. मोठ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आगार व्यवस्थापकाकडे सुट्टीसाठी अर्ज करणाऱ्या परिवहन बस चालकाने रजा न दिल्याने सीबीटी शहापूर नाका ते वडगाव या बसमध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांने जीवन संपवल्याची दुसरी घटना
जागतिक महिला दिनी परिवहन मंडळाच्या केशव कुमडोळी या मेकॅनिकने कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून जीवन संपवले होते. आता सुटी न दिल्याने परिवहन मंडळाच्या चालक कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.









