टीम लोकमन पुणे |
पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात पुणे शहरासह संपूर्ण राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता शनिवारवाडा परिसरातील एका हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारवाडा येथे भुयारी मार्ग प्रकल्प पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अचानक आलेल्या पावसामुळे उपस्थित सर्वजण जवळच असलेल्या अभिनंदन कडक चहा या हॉटेलमध्ये गेले.
यावेळी प्रमोद कोंढरे यांनी संबंधित महिला पोलीस अधिकार्याच्या पाठीमागे जाणीवपूर्वक उभे राहत अत्यंत घृणास्पद कृत्य केले आणि त्यामुळे महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ….
या घटनेने राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढत हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. “मी पक्षाच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांसोबत होतो, कोणत्याही महिला अधिकार्याशी गैरवर्तन केलेले नाही,” असा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी स्वतःहून पोलिसांना लेखी निवेदनही दिले आहे.
प्रमोद कोंढरे यांच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती असून या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.