टीम लोकमन बीड |
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटना सातत्याने वाढतच असून आताही एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. अंबाजोगाई येथील पोखरी रोडवर एका तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राजकुमार करडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने अंबाजोगाईसह संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार करडेवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे उपचार सुरू असताना राजकुमारची प्राणज्योत मालवली.
दरम्यान हा हल्ला कोणी केला आणि या हल्ल्यामागचे कारण काय हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिकचा तपास पोलिस करत आहेत.









