टीम लोकमन धाराशिव |
शेतजमिनीच्या वादातून व जुन्या वैरातून पती-पत्नीचा भरदिवसा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना करजखेडा चौरस्ता (ता. धाराशिव) येथे बुधवारी (दिनांक 13) दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये सहदेव भागवत पवार (वय-32), पत्नी प्रियंका सहदेव पवार (वय-28 राहणार करजखेडा) यांचा समावेश आहे. संशयित आरोपींमध्ये हरिबा यशवंत चव्हाण (वय-55) व त्यांचा मुलगा जीवन चव्हाण (वय-33 दोघे राहणार करजखेडा) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव पवार व हरिबा चव्हाण हे नात्याने आतेभाच्चे असून त्यांच्या शेतजमिनी एकमेकांच्या शेजारी आहेत. बांधावरील हक्कासंदर्भात दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी या वादाच्या पार्श्वभूमीवर सहदेव पवार याने जीवन चव्हाण याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
त्या गुन्ह्यात सहदेव पवार याला तुरुंगवास झाला होता. तो महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. सहदेव पवार तुरूंगातून सुटल्यापासून चव्हाण कुटुंबाच्या मनात राग होता. बुधवारी दुपारी सहदेव पवार हे पत्नी प्रियंका हिच्यासह दुचाकीवरून करजखेडा चौरस्त्याकडे कीटकनाशक खरेदीसाठी निघाला होता.
यावेळी हरिबा चव्हाण व त्याचा मुलगा जीवन यांनी चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच-24-एएफ-4065) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पती-पत्नी रस्त्यावर पडताच दोघा आरोपींनी कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला इतका अचानक व निर्दयी होता की पाहणाऱ्यांचे अंगावर काटा उभा राहिला होता. काही नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने बेंबळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. हत्याकांडातील आरोपींचा शोध सुरू असून त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या दुहेरी खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.