टीम लोकमन सोलापूर |
13 लाख रुपये खंडणी दिली नाही म्हणून एका 24 वर्षीय तरुणाला उचलून कारमध्ये डांबून घेऊन गेले. ही घटना बुधवारी रात्री आठ ते साडे आठ वाजता अक्कलकोट तालुक्यातील फत्तेसिह मैदानाजवळ घडली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तीन तासात सहा जणांना पकडले असून सहा आरोपींना गुरुवारी अक्कलकोट येथील न्यायाधीश एम. एन. कल्याणकर यांच्यासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कांबळे, मंजुनाथ गुंजले, राजपाल निकम, अभिषेक डोणी, समीर पटेल, नागराज शारप्पा गुंडूर यांच्यासह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू उर्फ बाळासाहेब श्रीशैल वाघमोडे हे फिरण्यासाठी फत्तेसिंह मैदानात गेले असता आरोपी कारमधून (KA 51 MJ 0337) त्या ठिकाणी आले. फिर्यादी वाघमोडे यांच्याकडे 13 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा वाघमोडे यांना शिवीगाळ, दमदाटी करून गाडीत घालून डांबून त्यांचे अपहरण केले. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्काळ चक्रे फिरवून तीन तासांत वागदरीजवळ कार पकडली. तेव्हा सहा आरोपींना ताब्यात घेऊन वाघमोडे यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. आरोपींना दिनांक 13 मार्च रोजी कोर्टासमोर हजर केले. पुढील तपास पोसई पवार हे करीत आहेत. आरोपीकडून ॲड. विजय हर्डीकर, तर फिर्यादीकडून सरकारी वकील गिरीश सरवदे यांनी काम पाहिले.
हत्याराच्या भीतीने कोणीच पुढे आले नाही
फिर्यादी वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. हत्याराच्या भीतीने कोणीच पुढे आले नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तीन तासात त्यांची सुटका केली. यात वाघमोडे हे जखमी झाले असून, सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आणखी दोन आरोपी पळून गेले
शोध पथकात पीएसआय पांडुरंग पवार, हवालदार शिवलिंग स्वामी, श्रीकांत जवळगे, प्रमोद शिंपाळे, केदारनाथ सुतार, धोंडिबा ठेंगळे यांनी कामगिरी बजावली. त्यात सहा जणांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी पांडुरंग उर्फ पांड्या शिंदे याच्यासह आणखी एकजण मिळून आला नाही.










