टीम लोकमन सांगली |
एका नामांकित विवाह संकेतस्थळावर स्वत:ची बनावट प्रोफाइल बनवून सांगली येथील डॉक्टर तरुणीची 4 लाख 70 हजार 131 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉक्टर तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित दलजी हाकू या नावाच्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉक्टर तरुणी या डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये एका कम्युनिटी विभागात त्यांनी स्वत:ची नावनोंदणी केली होती. या ॲपच्या माध्यमातून दलजी हाकू या बनावट नावाने प्रोफाइल बनवलेल्या व्यक्तीने डॉक्टर तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर संशयिताने त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे तसेच एका चॅटिंग ॲपच्या माध्यमातून संभाषण करून ओळख वाढविली. वारंवार संभाषण करून त्याने डॉक्टर तरुणीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्याने काही कामानिमित्त तिच्याकडून 4 लाख 70 हजार 131 रुपये घेतले. त्यानंतर तिच्याशी संपर्क कमी केला. तिने पैसे परत देण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु संशयित व्यक्तीने कोणताच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडला आहे. त्यामुळे तिने दलजी हाकू या नावाच्या तथाकथित व्यक्तीविरोधात पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.