टीम लोकमन मंगळवेढा |
एका विदेशी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुने गोवे येथील हेल्थवे इस्पितळातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. व्ही. दोशी (मूळ रा. सोलापूर) याला पोलिसांनी सांगली येथे जाऊन अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर इस्पितळाने तत्काळ निलंबित केले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली तरी 10 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पॅनिश महिला आजारी असल्याने तिला उपचारासाठी इस्पितळातील अतिदक्षता (ICU) विभागात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करत असताना डॉ. दोशी यांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यासह लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार इस्पितळ व्यवस्थापनाकडे करण्यात आली होती. ही घटना 10 दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर तिच्या बहिणीने 10 सप्टेंबर रोजी पोलिस स्थानकात या डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेनंतर डॉक्टर इस्पितळातून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन चौकशीसाठी डॉक्टरला ताब्यात घेतले व त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याची माहिती इस्पितळ व्यवस्थापनाला मिळताच त्वरित त्याच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिस तपासास पूर्ण सहकार्य करणार : व्यवस्थापन
दरम्यान हेल्थवे इस्पितळाच्या व्यवस्थापनाने लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या डॉ. दोशी याला सेवेतून निलंबित केल्याचे सांगितले आहे. तसेच पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केले जाईल. पीडित विदेशी रुग्ण महिलेवर उपचार सुरू असून तिला सर्व ती वैद्यकीय मदत व सहकार्य केले जाईल. असे निवेदन जारी केले आहे.