टीम लोकमन मंगळवेढा |
मेरठ करनाल राष्ट्रीय महामार्गावर भुनी टोल नाक्यावर 17 ऑगस्ट रोजी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून याठिकाणी टोल कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यातील जवान कपिल सिंह आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता या घटनेची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली असून टोल कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई केली आहे. NHAI ने मेसर्स धरम सिंह अँन्ड कंपनीवर 20 लाखांचा दंड ठोठावला असून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
मेरठच्या गोटका गावातील रहिवासी असलेल्या सैन्यातील जवान कपिल सिंह 17 ऑगस्टला रात्री चुलत भावासोबत दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला चालले होते. श्रीनगर येथे त्यांना ड्युटी ज्वाईन करायची होती. भुनी टोल नाक्यावर वाहनांची मोठी रांग होती. वेळ निघून जात असल्याने कपिल यांनी टोल कर्मचाऱ्यांना वाहन लवकर सोडण्याची विनंती केली. यावरूनच टोल नाका कर्मचारी आणि सैन्य जवान कपिल सिंह यांच्यात वाद झाला. त्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी या भारतीय सैन्य दलातील जवानाला मारहाण केली. टोल कर्मचाऱ्यांनी जवान कपिलला खांबाला बांधून लाठी काठीने मारले आहे.
कपिल सिंह यांना मारहाण होताना चुलत भाऊ शिवम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता मात्र कर्मचाऱ्यांनी शिवमलाही मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी टोल नाक्यावर गर्दी केली आणि टोल कर्मचाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करत तोडफोड केली.
या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. मेरठ पोलिसांनी या घटनेची गंभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या मारहाण प्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
NHAI ने कंपनीवर केली मोठी कारवाई
या प्रकाराची गंभीर दखल घेत NHAI ने तातडीने टोल जमा करणाऱ्या कंपनीवर 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात आणि टोल प्लाझावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली जे कराराचे मोठे उल्लंघन आहे. आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांचा सुरक्षित आणि अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत असे NHAI जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.