टीम लोकमन मंगळवेढा |
शिरवळ येथील इल्जिन ग्लोबल इंडिया कंपनीत काम करणाऱ्या अविनाश अशोक कोडग (वय 28, मूळ रहिवासी हांगिरगे ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुण इंजिनीअरने 10 जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूपूर्वी सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये तीन व्यक्तींचा उल्लेख करून त्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता अविनाशच्या रूम पार्टनरने त्याच्या मामाला फोन करून ही दुर्दैवी घटना कळवली. मामाने तात्काळ शिरवळ पोलीस ठाणे गाठले. पोलीस अधिकारी आणि इतर नातेवाईकांसोबत ते घटनास्थळी पोहोचले. तपासात अविनाश किचनमध्ये लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी भिंतीवर दोन चिठ्ठ्या सापडल्या. ज्यामध्ये अविनाशने आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये कंपनीतील देव कोळेकर, भिवाजी गाढवे, नीलेश पवार आणि काही युनियन सदस्यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. माझी खूप बदनामी करण्यात आली असून, या लोकांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा मजकूर या चिठ्ठीत होता. या चिठ्ठ्या अविनाशच्या हस्ताक्षरातील असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ओळखले आहे.
अविनाश बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअर असून गेल्या सात वर्षांपासून शिरवळ येथील एमआयडीसीमधील विविध कंपन्यांमध्ये नोकरी करीत होता. त्याच्या आत्महत्येचा प्राथमिक तपास सुरू असून सुभाष दामोदर सावंत यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक म्हस्के हे करीत आहेत.
अविनाशने काय लिहिले होते मृत्यूपूर्वी?
मम्मी, पप्पा, आज्जी, आत्या, मामी, पोपट, नितीन, अभिजित, जेधे सर, गाडे सर, सोहम सर, गोरख, विशाल, सुजित, महेश, सानिका, चव्हाण गुरुजी, गायकवाड सर मला माफ करा मी तुमचा कायम ऋणी राहील तर दुसऱ्या चिठ्ठीत देवा कोळेकर, भिवाजी गाढवे आणि नीलेश पवार आणि इल्जिन ग्लोबल इंडिया युनियन मेंबर यांनी खूप बदनामी केली आहे. त्यांना मी कधीच माफ करणार नाही.
– आपला अविनाश