टीम लोकमन मंगळवेढा |
3 वर्षापूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरगुती वादातून पाच दिवसांपूर्वी जवानाच्या पत्नीने गंगा नदीत उडी घेतली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा थांगपत्ता लागला नाही.
पत्नी सोडून गेल्याने पतीच्या वाटेला विरह आला. त्यातच सासरच्यांनी त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. यातून नैराश्य आलेल्या जवानाने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी दुपारी दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन त्याने गंगा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
पोलीस गंगा नदीत उडी घेतलेल्या बाप आणि मुलाचा शोध घेत आहेत. परंतु त्यांना शोधण्यात वेळ होत आहे तशी आशा संपत चालली आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजता एक युवक त्याच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सीतून बैराज पूरच्या गेट नंबर 17 ला आला. त्याने आधी पायातील चप्पल काढली, मोबाईल चप्पलेजवळ ठेवला. इतरांना काही कळणार इतक्यातच त्याने मुलाला मिठीत घेऊन गंगा नदीत उडी घेतली. टॅक्सी चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. त्यावेळी पुलाची दुरुस्ती काम करणारे लोक तिथे जमा झाले. अचानक झालेल्या दुर्घटनेने घटनास्थळी गोंधळ माजला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी माहिती घेतली असता नदीत उडी घेणाऱ्या तरुणाची ओळख बीएसएफ जवान राहुल असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. बोटीच्या मदतीने बीएसएफ जवान आणि त्याच्या दीड वर्षाचा मुलाचा शोध सुरू होता. परंतु संध्याकाळपर्यंत काहीही हाती लागले नाही. राहुल आणि त्याची पत्नी मनीषा यांचा 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. परंतु हळूहळू किरकोळ गोष्टींवरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. राहुल सध्या अहमदाबाद येथे तैनात होता. मार्च महिन्यात तो एक महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. त्याचवेळी पॅरालाइसिस अटॅक आल्याने त्याने 5 महिने सुट्टी वाढवली होती.
5 दिवसांपूर्वी राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. त्या वादात मनीषा घराबाहेर पडली आणि तिने गंगा नदीत उडी घेतली. मनीषाचा अद्याप शोध लागला नाही. परंतु तिच्या नातेवाईकांनी राहुलवर मानसिक छळ, हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दिली. पत्नीचा विरह आणि सासरच्यांनी केलेले आरोप यामुळे राहुलला नैराश्य आले होते. अलीकडेच पत्नीने गंगा नदीत उडी घेतली. त्यानंतर राहुलने त्याच्या दीड वर्षाच्या मुलासह गंगेत उडी घेतली. त्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या या तिघांचाही शोध घेतला जात आहे.