टीम लोकमन मंगळवेढा |
विवाहाच्या आमिषाने चोरट्याने एका महिलेची 3 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका 44 वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून बाणेर पोलिसांकडून माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची फिर्यादी महिला बाणेर भागात वास्तव्यास आहे. चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता आणि पुतण्याचा विवाह करायचा आहे असे चोरट्याने महिलेला सांगितले होते. आरोपीने एका नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपनीत बंगलोरला कामाला असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून विवाहासाठी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत. सध्या गॅझेट सेल आहे. ते घेण्यासाठी मला पैशांची गरज आहे असे सांगून या महिलेकडून वेळोवेळी 3 लाख 23 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले.
महिलेने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.