सोलापूर : सुरज राऊत
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांची सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सोलापूर येथे जाहीर सभा होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून मातब्बर नेते प्रचारात उतरवले जात आहेत. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभाही होणार आहे. सोमवारी होणाऱ्या शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे.
सोलापूर शहरातील कर्णिकनगर येथील मैदानावर पवार व ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे सोलापुरात काय बोलतात याची सोलापूरकरांना उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्रित सभा होत असल्याने महाविकास आघाडी व विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पहायला मिळते.
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोलापूर शहरासह मतदार संघातील ग्रामीण भाग त्या पिंजून काढत आहेत. वडिलांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढत कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठायचीच या इराद्याने प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या असून त्यांनी प्रचारात जोर लावला आहे. प्रणिती शिंदे या अभ्यासू आमदार म्हणून ओळखल्या जातात. सोलापूरच्या प्रश्नांवर विधिमंडळात त्या सातत्याने आवाज उठवताना दिसत होत्या. आता त्या खासदार होऊन सोलापूरच्या प्रश्नांवर लोकसभेत आवाज उठवणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










