टीम लोकमन मंगळवेढा |
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. या निर्णयातून रुग्णसेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले आहे.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास देखील सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल असेही ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात. असेही ते म्हणाले.
नव्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत…
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
शपथविधीनंतर नवे सरकार लगेचच मंत्रालयात….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर लगेचच मंत्रालयात प्रवेश केला. यावेळी या तिघांचेही सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालय प्रांगणातील राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेलाही अभिवादन केले.
तत्पूर्वी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की… असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी मुंबईतील आझाद मैदानावर घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा उत्पन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी, अभिनेता शाहरुख खान, रणबीर सिंग, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.