टीम लोकमन पंढरपूर |
कोर्टी तालुका पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने “स्कूल कनेक्ट 2.0” हा अभिनव उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गादेगाव येथे संपन्न झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक शशिकांत जगदाळे आणि अटल समन्वयक योगेश कंगळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून झाले. राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी 2023-24 पासून करण्यात येत असून याचाच दुसरा भाग स्कूल कनेक्ट 2.0 हा 2024-2025 राज्यभर सुरू असून त्या अंतर्गत पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गादेगाव येथे हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या नाविन्यपूर्ण संधी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती, सेवा व सवलती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विद्यार्थी केंद्री विविध बदल, विद्यापीठांचे बहुउद्देशीय लवचिक अभ्यासक्रम, मुक्त दुरुस्त शिक्षणाच्या संधी या विषयावर एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. अभिजीत सवासे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
नाविन्यपूर्ण उपक्रमाने सजलेल्या महाविद्यालयातील या कार्यक्रमामध्ये सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गादेगावचे मुख्याध्यापक शशिकांत जगदाळे, अटल समन्वयक योगेश कंगळे, सिंहगड कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. अभिजीत सवासे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









