टीम लोकमन मरवडे |
मरवडे तालुका मंगळवेढा येथील ज्येष्ठ पंचांगकर्ते व पुरोहित संजय सन्मुख स्वामी महाराज यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते.
संजय स्वामी महाराज हे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि धार्मिक विधी करणारे पुरोहित म्हणून सुप्रसिद्ध होते. संजय स्वामी महाराज यांच्या पंचांगावर विश्वास ठेवणारे हजारो भाविक आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातही त्यांचा भक्तगण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हजारो भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत.
आज दुपारी त्यांच्या छातीमध्ये वेदना होत असल्याने त्यांना मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच अत्यावस्थ होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलच्या कार्डियाक ॲम्बुलन्स मधून त्यांना उपचाराकरिता सोलापूर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
संजय स्वामी महाराज यांचे पश्चात पत्नी, वृद्ध आई, एक विवाहित मुलगी, जावई, एक विवाहित मुलगा, सून असा मोठा परिवार आहे. ते धार्मिक विधी करणारे पुरोहित म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यासोबतच मरवडे येथे त्यांच्या कुटुंबीयांचा कापड व्यवसायही आहे.
वयाच्या अवघ्या 55 व्या वर्षी संजय स्वामी महाराजांच्या अकाली जाण्याने मरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने हजारो भक्तगण हळहळ व्यक्त करीत आहेत. आज रात्री 11 वाजता मरवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.









