टीम लोकमन पंढरपूर |
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच नैतिक मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सिंहगड महाविद्यालय शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत, केवळ उत्कृष्ट अभियंतेच नव्हे तर सुजाण नागरिक घडविण्यास तत्पर आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी ही आजच्या डिजिटल युगातील एक अत्यंत गतिमान आणि प्रभावी शाखा आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, सॅटेलाइट कम्युनिकेशन, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळाशी या शाखेचे मूलभूत योगदान आहे. त्यामुळे, मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी मेहनत, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती आवश्यक आहे.”
त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षण, इंडस्ट्री कोलॅबोरेशन, प्रोजेक्ट-आधारित लर्निंग आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट या बाबींवर भर देण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या तांत्रिक उपक्रम, कार्यशाळा, गेस्ट लेक्चर्स, औद्योगिक भेटी आणि संशोधन प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच, GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेचे महत्त्व सांगताना त्यांनी असे स्पष्ट केले की, GATE परीक्षा केवळ उच्च शिक्षणासाठीच नाही, तर विविध नामांकित सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी (PSU Jobs) महत्त्वाची आहे.
विद्यार्थ्यांनी तिसऱ्या वर्षापासूनच GATE परीक्षेच्या तयारीस सुरुवात करावी, असे त्यांनी आवाहन केले. “GATE स्कोअरच्या माध्यमातून तुम्हाला IITs, NITs आणि इतर नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळते, तसेच BHEL, ONGC, DRDO, ISRO, BSNL, आणि विविध सरकारी संस्थांमध्ये उत्कृष्ट करिअरची दारे उघडतात.
त्यांनी सरकारी नोकऱ्यांच्या संधींवर प्रकाश टाकताना, विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC, SSC, RRB आणि इतर सरकारी भरती प्रक्रियांसाठीही तयारी करावी असे मार्गदर्शन केले. “सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही, तर सामान्य अध्ययन, संख्यात्मक क्षमता, आणि संवाद कौशल्य यावरही भर द्यावा. या दृष्टीने आम्ही महाविद्यालयात विविध मार्गदर्शन शिबिरे आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत करणारे उपक्रम राबविणार आहोत.”
कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








