टीम लोकमन मंगळवेढा |
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आहे. तर चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांना हत्यारबंद चोरांना पकडण्यात यश आले आहे. पोलिसांनी तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न जेजुरी पोलिसांकडून केला जात आहे. चोरीच्या घटनांमध्ये घट झाली असली तरी शनिवारी (दिनांक 13) दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून रोख रक्कम 50 हजार रुपये चोरुन तीन चोरांनी पोबारा केला होता. मात्र स्थानिक तरुणांनी त्यांच्या पाटलाग सुरु केला. नीरा नजीक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली. त्यांना थांबावे लागले. दरम्यान दौंडज पासून चोरांचा पाठलाग करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले. मात्र या तरुणांना पिस्तूलचा घाक दाखवून यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले.
दरम्यान याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे व पीएसआय सर्जेराव पुजारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर यादरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसले होते. यावेळी दौंडज, वाल्हा, जेऊर, पिसुर्डी, पिंपरे, नीरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले. त्यामुळे चोरांना पळून जाता आले नाही.
दरम्यान पोलिसांनी ड्रोन आणले. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्वे करण्यात आला. उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्यामुळे कोणताही धोका न पत्करता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा. कोणीही उसाच्या शेतामध्ये जाऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर ऊसाच्या शेतामध्ये असल्याचे दिसून आले. यानंतर पोलीस आणि तरुणांनी जाऊन अखेर या चोरांच्या मुसक्या आवळल्या.
जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिकचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिली. चोरांना पकडण्यासाठी पोलिस टीम मध्ये रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, संतोष मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, प्रसाद कोळेकर आदींनी सहभाग घेताला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. रात्री जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय 35), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय 30) दोघे रा. रामटेकडी हडपसर पुणे, रत्नेश राजकुमार पुरी (वय 23) राहणार संभाजीनगर यांना ताब्यात घेतले आहे.