टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर येथील नूमवी शाळेत श्रावण सोहळा अतिशय जल्लोषात व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यात श्रावणातल्या विविध गाण्यांवर सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कारांनी डोळ्याचे पारणे फेडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या संचालिका, सोलापुरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. नयना व्यवहारे व ज्येष्ठ शिक्षिका स्मिता माळवदकर यांचेहस्ते करण्यात आले. रोहिणी चौधरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्या डॉ. नयना व्यवहारे यांचा सत्कार स्मिता माळवदकर यांचेहस्ते करण्यात आला.
प्रशालेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा….’ तर पहिलीच्या विद्यार्थिनींनी ‘चला ग सयांनो नागपंचमीच्या सणाला….’, दुसरीच्या विद्यार्थिनींनी ‘लाडक्या बंधुराया आले मी राखी बांधाया….’ तर तिसरीच्या मुलांनी ‘आला रे आला गोविंदा आला….’ अशा श्रावणातल्या विविध सणावर आधारित गीतांवर सुंदर अशा नृत्यांचे सादरीकरण केले. या सर्व विद्यार्थ्यांना सीमा कोळी, हेमलता बिराजदार, सविता नवगिरे, शिवशंकर बिराजदार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यानंतर शिवस्मारक आयोजित देशभक्तीपर गीत गायन या स्पर्धेत प्रशालेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका मीनाक्षी कुलकर्णी तसेच नर्मदा कनकी व दीपा कुलकर्णी यांचा भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादी वाचन आशा गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या माता पालकांनी मंगळागौरच्या गाण्यातून मंगळागौरीचे विविध खेळ सादर केले व शेवटी सामाजिक संदेशही दिला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे….’ याची जाण ठेवून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. नयना व्यवहारे यांच्या शुभहस्ते झाडांना राखी बांधण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगत आतून श्रावणातल्या प्रत्येक सणाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्व यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका हिरेमठ यांनी केले तर रोहिणी चौधरी यांनी आभार मानले.









