टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशानुसार श्री संत दामाजी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथे तहसीलदार मदन जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शैलेश मंगळवेढेकर यांनी तहसीलदार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात माहिती दिली.

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही. त्यामुळे 17 मार्च 2025 पासून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे धरून निवेदन देण्यात आले.
जुनी पेन्शन लागू करावी, अंशत्ता अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावा, निवृतीचे वय 60 करावे, प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन त्वरित करावे अशा विविध मागण्या केल्या असून सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी श्री संत दामाजी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.









