टीम लोकमन मंगळवेढा |
एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख संपूर्ण देशाला आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकी मध्ये सोलापूर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असतेच. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या दोन युवा आमदारांमध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीचा उद्या निकाल असल्याने सोलापूर मधून कोण बाजी मारणार याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करणाऱ्याच्या तयारीने भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. तर दुसरीकडे दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रसकडून जोरदार ताकद या मतदारसंघात लावण्यात आली होती. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन विद्यमान तरुण आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
सोलापूर लोकसभा मतदार संघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे. सोलापुरात 59.19 टक्के मतदान झाले आहे. गतवेळी 58.57 टक्के मतदार झाले होते. गतवेळपेक्षा यंदा 0.62 टक्के जास्त मतदान झाले आहे. हे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सोलापुरकारांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत होईल असे चित्र होते. काँग्रेस, भाजपसह वचिंतनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. परंतु त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारला बसला होता. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होते. मात्र गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नाही असेच चित्र दिसत असल्याने खरी लढत प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यातच झाली.

2024 सोलापूर विधानसभानिहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे, मोहोळ 63.15, सोलापूर शहर उत्तर 59.15, सोलापूर शहर मध्य 56.51, अक्कलकोट 59.17, सोलापूर दक्षिण 58.28, पंढरपूर 59.04 टक्के मतदान झाले. असे एकूण अंदाजे 59.19 टक्के मतदान झाले आहे. या निकालाबाबत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून उद्या काय निकाल लागतो याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मतदारांचे डोळे लागले आहेत.










