टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली असून आता मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती.
राज्याचे पुढील पोलीस महासंचालक निवडीसाठी मुख्य सचिवांना 05 नोव्हेंबर 2024 दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. माहितीनुसार तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.
कोण आहेत विवेक फणसाळकर?
– विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
– मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी ते महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते.
– 2016 -18 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
– दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते.
– पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
– नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि परभणीत अधिक्षक पद भूषविले आहे.
– विवेक फणसाळकर यांना मुंबईची आणि मुंबई पोलिस दलाची चांगल्या प्रकारे माहिती आहे.
– मुंबई पोलिस दलात प्रशासन विभाग आणि मुंबईच्या वाहतूक कोंडीची समस्या हाताळणाऱ्या वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
– शांत स्वभाव पण तितकेच शिस्तप्रिय अधिकारी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही विवेक फणसाळकर यांची वैशिष्ट्ये आहेत.










