टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून यासंदर्भात नुकतीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
एका शाळेतील इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळत असून संबंधित बस चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या घटनेत आबिद हुसेन शेख जलील (वय 38) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हा स्कूल बस चालक आहे. ज्या मुलीला तो दररोज शाळेत सोडायला आणि आणायला जात होता त्याच मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या नराधमाने मुलीला धमकावत एका शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता बस चालकाने विनयभंग नाही तर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्कूल बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.