टीम लोकमन बोराळे |
नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा यांचेवतीने आषाढी वारीचे औचित्य साधून बाल वैष्णवांच्या दिंडीचे मंगळवारी दिनांक 16 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सकाळी प्रशातीलेतील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या वेशात प्रशालेत उपस्थित झाले. संस्थेचे सदस्य तथा मातुलिंग हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी.के. बिराजदार सर यांच्या हस्ते व युवानेते सचिन नकाते यांच्या उपस्थितीत पालखीची पूजन करून विठ्ठलाच्या आरतीने दिंडीची सुरुवात करण्यात आली.

या बाल वारकरी वैष्णवांच्या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्याचे वेश परिधान करून संपूर्ण टाळ, मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या दिंडीत श्री विठ्ठल, रुक्माई, जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शंकर, पार्वती, गणपती, वासुदेव, भालदार, चोपदार, आदि वेशभूषेमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.

दिंडीमध्ये अनेक पारंपरिक खेळ सादर करण्यात आले जसे की फुगड्या, काटवटखाना, गवळण, भारुड अभंग, वासुदेव गीते सादर करण्यात आली. अनेक विद्यार्थिनींनी तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. प्रशालेचे मैदान, एस.टी स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, पांडुरंग मंदिर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वैष्णवांच्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला, ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून पाण्याची सोय करण्यात आली होती.
प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ लेझीम अतिशय सुंदर तालबद्ध पद्धतीने वेगवेगळे प्रकार सादर करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले व दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये प्रशालेतील शिक्षक ही सहभागी झाले होते. शेवटी दिंडीचा समारोप झाल्यानंतर प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहारची सोय करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, तसेच शिक्षकेतर बांधव यांनी परिश्रम घेतले. नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, बोराळेचे अध्यक्ष भिमराव विठ्ठलराव पाटील यांनी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.









