टीम लोकमन मंगळवेढा |
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर फटेवाडी येथे संपन्न झाले. 21 फेब्रुवारी रोजी या विशेष श्रम संस्कार शिबीराचा सांगता समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भीमराव विठ्ठल पाटील यांचेहस्ते व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव यांचे अध्यक्षतेखाली तसेच फटेवाडीच्या सरपंच सीमा प्रकाश काळुंगे, दिगंबर शिंदे, प्रकाश काळुंगे, पोलीस पाटील सुनील फटे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय गायकवाड, प्रा. डॉ. राजेश गावकरे, प्रा. प्रशांत धनवे, प्रा. शैलेश मंगळवेढेकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. एम. होनराव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचे समन्वयक प्रा. डॉ. संजय शिवशरण यांचे उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी फटेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातर्फे फटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा काळुंगे, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सेवक यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे संभाजी चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फटेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय मासाळ, सूरज चव्हाण, महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी मिस्त्री पवार, मल्लय्या कोळी, वरिष्ठ विभागातील महाविद्यालयाचा उत्कृष्ट स्वयंसेवक विनायक नागणे, उत्कृष्ट स्वयंसेविका सिद्धी जाधव, कनिष्ठ विभागाचा उत्कृष्ट स्वयंसेवक ओंकार गवळी, उत्कृष्ट स्वयंसेविका वैष्णवी गडदे, आदर्श स्वयंसेवक वरिष्ठ विभाग आनंदा वरकुटे, आदर्श स्वयंसेविका वरिष्ठ विभाग वैष्णवी ताटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत फटेवाडी यांच्याकडून श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संस्थेस संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भीमराव विठ्ठल पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाविद्यालयासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड, प्रा. डॉ. राजेश गावकरे, प्रा. प्रशांत धनवे, प्रा. शैलेश मंगळवेढेकर याचबरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची योजनेतील विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना फटेवाडी गावच्या सरपंच सीमा प्रकाश काळुंगे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयाने केलेल्या कामाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. पुढील वर्षीही फटेवाडी गावामध्येच विशेष श्रम संस्कार शिबीर राबवावे अशी अपेक्षाही महाविद्यालयाकडे व्यक्त केली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना मैत्री, संघटन, समरसता, विनयशीलता, धाडस या पंचसूत्रीचे महत्व अधोरेखित करून याचा आपल्या आयुष्यात अवलंब केला तर आपण सहजपणे जीवनात यशस्वी होऊ शकतो असे संबोधित केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव म्हणाले, फटेवाडी हे गाव धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी अशा विविध कार्यामध्ये अग्रेसर असून या गावाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे हे गाव आहे. या गावांमध्ये आम्हाला राष्ट्रीय सेवा योजना शिबीर राबवण्याची संधी ग्रामपंचायतीकडून मिळाली त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सुरुवातीस आभार मानले.
या गावांमध्ये आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर संपन्न केले. या राष्ट्रीय सेवा योजनेस ‘श्रम संस्कार शिबीर ‘असे नाव शासनाने दिले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व लक्षात यावे, श्रमाची लाज न बाळगता चांगल्या पद्धतीने श्रम करून समाजसेवा करावी हा हेतू आहे. त्या पद्धतीने आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने विविध प्रकारची कामे व उपक्रम फटेवाडी गावामध्ये राबवून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने पुढील वर्षीही आम्ही या गावात चांगल्या पद्धतीचे भरीव असे काम करणार आहोत. याप्रसंगी आदर्श स्वयंसेवक आनंदा वरकुटे व आदर्श स्वयंसेविका वैष्णवी ताटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच फटेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत धनवे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेश गावकरे यांनी मानले.









