टीम लोकमन मंगळवेढा |
4 हजाराहून अधिक ठेवीदारांची सुमारे 2 हजार 470 कोटी रुपयांची फसवणूक करुन पोलिसांना गुंगारा देत गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची संचालक अर्चना सुरेश कुटे हिला सीआयडीने पुण्यातील बाणेर येथून अटक केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुरेश कुटे याला सीआयडीने यापूर्वीच अटक केली आहे. अर्चना कुटे ही सुरेश कुटे याची पत्नी आहे.
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व अधिकारी यांच्या विरोधात मे ते सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 95 गुन्हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे तपासाकरीता आहेत. सीआयडीचे पथक पुणे येथे गेले असता कुटे ग्रुपची बिजनेस प्रमोटर अर्चना कुटे हिने अपहरीत रक्कमेतून मिळवलेली जंगम मालमत्ता ज्यात सोने 80 लाख 90 हजार 950 रुपयांचे 60 नग, 56 लाख 75 हजार 500 रुपयांचे चांदीचे 270 नग, 63 लाख रुपयांची रोकड तसेच 10 लाख रुपयांची बीएमडब्ल्यु, स्कुटी असा 2 कोटी 10 लाख 75 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुरेश कुटे आणि त्याची पत्नी अर्चना कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून 4 हजारांहून अधिक ठेवीदारांचे सुमारे 2 हजार 470 कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) ने सुरेश कुटे आणि इतर आरोपींच्या 333 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी या गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा बीड व सीआयडी छत्रपती संभाजीनगर यांनी एकूण 207 मालमत्तेचे प्रस्ताव तयार करुन पुढील कारवाईकरीता सादर केलेले आहेत. एकूण 13 संचालकांपैकी 9 संचालक व मुख्य आरोपी सुरेश ज्ञानोबा कुटे याची पत्नी अर्चना सुरेश कुटे हिला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, सीआयडीच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, पोलीस उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, पोलीस हवालदार कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत, सहायक फौजदार सय्यद रफिक यांनी केली आहे.