टीम लोकमन मंगळवेढा |
राजकारणात कधीच कोणी कायमचा शत्रू व मित्र नसतो परंतु निवडणूक काळात प्रत्येकाने आपल्या पक्षाबाबत प्रामाणिकपणे भूमिका घेऊन काम करावे लागत असते यातून वेळ काढून मतदाना दिवशी आमदार समाधान आवताडे व शिवसेना तालुकाप्रमुख येताळा भगत यांनी मतदान केंद्राबाहेर निवडणूक प्रक्रिये बाबत चर्चा केली व आपल्या जुन्या सहकारी असलेल्या गुरु सोबत हितगुज करत आमदार आवताडे यांनी राजकीय कटूता टाळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
२०१४ ते २०१९ या काळात भारतीय जनता पक्ष शिवसेना यांचे सरकार अस्तित्वात होते. त्यावेळेला विधानसभेसाठी तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शैला गोडसे या मोर्चे बांधणी करत होत्या. त्यांनी त्यांच्या विश्वासातील असलेल्या तुकाराम कुदळे यांना शिवसेना तालुकाप्रमुख पद देऊन काम करण्याची संधी दिली होती. त्यावेळी येताळा भगत यांनी पक्षाचे सक्रिय पद न घेता तालुक्यातील भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे या दृष्टीकोनातून आपले शैक्षणिक कार्यकाळातील विद्यार्थी असलेल्या समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी प्रश्नांचा चांगला अभ्यास असलेले नेते म्हणून भगत यांची तालुक्यात ओळख आहे. शिवसेनेसोबत तीस वर्षांपासून काम करत असताना ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी त्यांनी निर्माण केले शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभी करत असताना प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येताळा भगत कार्यरत होते.
या त्यांच्या कार्याचा समाधान आवताडे यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला पोटनिवडणुकीमध्ये भगत यांच्या शिष्याला दिलेल्या मार्गदर्शनामुळे विजय सुकर झाला. असे असले तरी राजकीय समीकरणे बदलल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये शिवसेना (उबाठा) निर्माण झाल्यानंतर परत एकदा येताळा भगत यांच्यावर तालुका प्रमुखाची जबाबदारी आल्याने त्यांनी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्याशी जवळीकता कमी करून पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांच्यासमवेत ग्रामीण भाग पिंजून काढला व मतदान प्रक्रियेमध्ये हिरीरीने सहभाग घेतला शिवसेनेची यंत्रणा कामाला लावली. यानंतर मात्र मतदानाच्या दिवशी मंगळवेढ्यातील मतदान केंद्राबाहेर या गुरु शिष्यांची भेट झाली यानंतर दोघांमध्ये दहा मिनिटे राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मतदानाचा टक्का व ग्रामीण भागातील मतदारांची मानसिकता यावर हितगुज करत दोघांनीही आपल्या राजकीय पक्षाचे ओझे बाजूला ठेवत एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला.