टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील 20 हजाराच्या आसपास विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डीबाटु), लोणेरे ता. माणगाव, जि. रायगड अंतर्गत विविध महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्ष चालू झालेनंतर प्रत्येक सहा महिन्याला सत्र परीक्षा होत असतात. सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यातील शेकडो विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या परीक्षेतील मिळालेल्या गुणांविषयी शंका असल्यास पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करावा लागतो.
तद्नंतर पुनर्मुल्यांकनाची गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर पुढील शिक्षणासोबत येणाऱ्या सत्र परीक्षेची तयारी करावी लागते. या दरम्यान विद्यापीठ मागील अनेक वर्षांपासून काही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रिमेडिअल परीक्षा घेत असते. दोन सत्रामधील हि प्रक्रिया वेळेवर पार पडल्यानंतर पुढील येणाऱ्या सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागील राहिलेले विषय व चालू विषयांचा अभ्यास करून परीक्षेस सामोरे जावे लागते.
अभियांत्रिकीच्या प्रत्येक वर्षातील विद्यार्थ्यांना ह्या संपूर्ण प्रक्रियेतून आपले शिक्षण पूर्ण होऊन पदवी हातात मिळेपर्यंत जावेच लागते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेला मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठाकडून विलंब होत असून सत्र परीक्षा, अवेळी, विलंबित निकाल, पुनर्मूल्यांकन, रिमेडिअल परीक्षा वेळेवर न घेणे अशा अतिशय गंभीर प्रकार विद्यापीठ प्रशासनाकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सोलापूर ,लातूर, बीड व आसपासच्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आपले अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत.
यातील शेकडो विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करत असताना अनेक संघर्ष, समस्यातून जावे लागते. शिक्षण घेणारे हे सर्व युवक देशाचे उज्वल भविष्य असून ह्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अशा ढिसाळ, बेजबाबदार कारभारामुळे प्रचंड मानसिक कुचंबणेतून जावे लागत आहे. ह्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठातील संबंधितांना ह्या सदोष प्रक्रियेविरोधात तक्रार करूनही कोणतेही निदान वेळेवर केले जात नसल्याने पावलोपावली जाणवत आहे. जणू विद्यार्थ्यांचे बौद्धिक शोषण करण्याचा चंगच विद्यापीठ प्रशासनाने बांधल्याचे दिसत आहेत.
वेळेवर परीक्षा घेणे, पुनर्मूल्यांकन निकाल लावणे, एमसीक्यू बेस रिमेडिअल परीक्षा वेळेवर घेऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणास संधी देणे अशा विविध मागण्यांसाठी विद्यापीठ कुलगुरू, प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. परंतु विद्यापीठाने आजतागायत यावर कोणतीही योग्य कारवाई केलेली नाही. यावरून विद्यापीठाचे कुलगुरू व प्रशासनाचा निर्ढावलेपणा सिद्ध होत असून ॲकेडेमीक कौन्सिल बरखास्त करून कुलगुरू कारभारी काळे यांची हकालपट्टी करावी व सर्व विद्यार्थ्यांची एमसीक्यू बेस रिमेडिअल परीक्षा तातडीने घेण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी संघटनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष राकेश पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थांचा प्रश्नाकडे ताबडतोब लक्ष घालून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील युवकांचा व विद्यार्थांचा भवितव्याचा विचार करून हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावून तालुक्यातील 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.










